स्पर्धात्मक युगात टिकून राहायचं असेल सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन स्किल्सचा वापर करून विकास करावा ; डॉ नरेंद्र गोवेकर

बेधडक मी मराठी न्यूज

  • शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम -उषा) अंतर्गत “विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रम” चे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व वक्ते फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे अप्रुव्हल ब्युरोचे सल्लागार डॉ नरेंद्र गोवेकर, पुणे येथील स्किल डेव्हलपमेंटचे पायलॉट ट्रेनर वक्ते प्रा. सुरेश पांडे, नंदुरबार येथील जी. टी. पाटील वरीष्ठ महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक वक्ते डॉ सतीश सुर्रे, पू. सा. गु. वि. प्र. मंडळाचे वरीष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक वक्ते डॉ वजीह अशहर महाविद्यालाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार, प्राचार्य डॉ एम.के.पटेल, प्राचार्य डॉ एन.जे. पाटील, प्राचार्य आर. एस.पाटील, प्राचार्या प्रा. कीर्ती महाडिक आदी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवत्ता सुधारणे आणि उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना 2013 मध्ये सुरु केली. त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा 2018 मध्ये राबविण्यात आला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या योजनेचा तिसरा टप्पा पीएम-उषा या नावाने 2023 मध्ये जाहीर करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी व वक्ते डॉ नरेंद्र गोवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, रिसर्च (संशोधन) ही काळाची गरज आहे त्यासाठी लागणाऱ्या विविध पायऱ्या असून संशोधन करण्यासाठी लागणारी माहीती व संशोधन करतांना मुख्य घटक जे असतात त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे त्याचप्रमाणे यामध्ये विविध पद्धतीचा वापर केला जातो. यावेळी त्यांनी लिंबाचे पान, पपई, यांच्यासह विविध उदाहरण देऊन संक्षिपतात स्पष्ट केले. संशोधन पद्धती खूप महत्त्वाचे असून संशोधन ही एक वैज्ञानिक कार्यपद्धत आहे. संशोधन ही कधीच न संपणारी प्रक्रिया आहे त्यात अनेक अडचणी येत असतात परंतु विद्यार्थ्यांनी त्या अडचणींवर मात करून संशोधनाचे कार्य अविरत पणे चालू ठेवावे. खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न ठेवता नव नवीन कल्पनांवर अभ्यास व संशोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यानी आपल्या जीवन जगण्याची कला कशी आत्मसात केली पाहिजे व कशा पद्धतीने संकटांना धैर्याने सामोरे जायला हवे हे त्यांनी स्पष्ट केले. संशोधन करतांना मनोधैर्य आणि आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा घटक असतो आणि तो घटक संशोधकांमध्ये असणे गरजेचे असते आणि तो त्याच्या साह्याने संशोधन पूर्ण करू शकतो. दैनंदिन जीवनात आपण केलेले कार्य हे आपण स्वतः समाधानी होत नाही तोपर्यत अविरत कार्य करावे. जिद्द व चिकाटीने जर कोणतेही कार्य केले तर ते पूर्ण होत असते. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचं असेल सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन स्किल्सचा वापर करून विकास करावा. दुसरे वक्ते प्रा. सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मातृभाषा विषयी सखोल हसत खेळत महत्त्व पटवून दिले. मुलाखत देतांना कोणती काळजी घ्यावी आणि काय करावे त्यात प्रामुख्याने आपण जेव्हा मुलाखत देतो त्यावेळी आपला पेहराव आणि शरीरभाषा यामधून मुलाखत घेणाऱ्यांना कसं आकर्षित तसेच आपण कसे बोलावे काय बोलावे तसेच विद्यार्थ्यांनी आपला परिचय कसा द्यावा याविषयीचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलाखत घेणारे लोक काय बघतात, कशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात तसेच मुलाखत देतांना विद्यार्थ्यांचा अटीट्युड कसा असायला हवा या सर्व विषयांवर सखोल चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. तिसरे वक्ते डॉ सतीश सुर्रे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, करिअर घडवण्यासाठी कौशल्यांचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही. पण, कोणकोणत्या कौशल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी सॉफ्ट आणि हार्ड स्किलची आवश्यकता असते त्यात सॉफ्ट स्किल हा करिअर घडवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. त्यानंतर शेवटी वक्ते डॉ वजीह अशहर यांनी सांगितले की, स्वतःविषयी जागरूकता, स्वतःचे विश्लेषण, भावनिक बुद्धिमत्ता, प्रेरणा आणि ध्येय साध्य, निर्णयक्षमता, तणाव हाताळण्याची क्षमता, गंभीर विचार या सात बाबींवर मुख्यतः सखोल मार्गदर्शन केले. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक मजल सर करताना या स्किल्स खूप महत्त्वाच्या ठरतात. हे सगळे स्किल्स जर आत्मसात केले असतील तर एक यशस्वी करिअर घडवण्यात कोणतीच अडचण येत नाही. या सर्व वक्त्यांनी आजच्या काळात नुसतंच टेक्नॉलॉजीवर प्रभुत्व असून चालत नाही. पण, संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स), लेखन कौशल्य, प्रेझेंटेशन स्किल्स, निर्णयक्षमता (डिसिजन मेकिंग स्किल्स), सर्जनशीलता (क्रिएटीव्ह स्किल्स), समूहात/लोकांबरोबर काम करण्याचं कौशल्य (टीम स्किल्स/ इंटरपर्सोनल स्किल्स), भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स), नेतृत्व गुण (लीडरशिप स्किल्स), वेळेचं नियोजन (टाइम मॅनॅजमेंट), समस्यांचं निरसन करण्याची क्षमता (सोल्युशन ओरिएंटेशन/ प्रॉब्लेम सोलविंग), नेटवर्किंग स्किल्स म्हणजेच लोकांशी असलेला आपला संबंध, तणाव हाताळण्याची क्षमता (स्ट्रेस मॅनॅजमेंट) असे आणि असे बरेच कौशल्य आज करिअर टिकवण्यासाठी आणि घडवण्यासाठी महत्त्वाची ठरतात. सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती ताईसाहेब कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक श्री मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अमित धनकानी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मृणाल न्हाळदे यांनी केले. सदर कार्यक्रमात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील 180 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *