अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि खाजगी इसम लाच प्रकरणात अटकेत, धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

 

  • बेधडक मी मराठी न्यूज

अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि खाजगी इसम लाच प्रकरणात अटकेत

धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

धुळे : – धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सध्या भ्रष्टाचारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. आज पुन्हा विभागाने केलेल्या कारवाईत लोकसेवक किशोर देशमुख, औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासन कार्यालय, धुळे यांच्या सांगण्यावरुन खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांचेकडून ८,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम तुषार जैन यांना स्विकारतांना रंगेहाथ पकडले म्हणुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी मौजे शिरपुर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असुन त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरु करायचे असल्याने त्याचा परवाना मिळणेकरीता त्यांनी दि.२५. ०२.२०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता.

सदर अर्जाबाबत तकारदार व त्यांचा आतेभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथे जावुन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपुर येथे मेडीकल दुकानदार तुषार जैन यांचेसह दि. ०४.०३.२०२५ रोजी त्यांचे दुकानावर येवुन स्थळपरिक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे ८,०००/- रुपये दयावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तकारदार यांनी दि. ०४.०३.२०२५ रोजी ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.

सदर तक्रारीची दि. ०४.०३.२०२५ रोजी शिरपुर येथे जावुन पडताळणी केली असता शिरपुर येथे तकारदार यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या दुकानावर औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खाजगी इसम तुषार जैन यांचेसह गेले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे ८,०००/- रुपये लाचेची मागणी केली. त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता.

त्याप्रमाणे आज दि. ११.०३.२०२५ रोजी धुळे येथील पारोळा चौफुली येथे सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी त्यांच्या कारने येवुन पंचासमक्ष तकारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुध्द आझादनगर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *