नंदुरबार: मधील श्री बालाजी संस्थानचा होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा होत असे. या होलिकोत्सवाला दोनशे वर्षाची परंपरा आहे. होलिकोत्सव म्हटला म्हणजे बिभत्स बोलणे, सभ्यता सोडून वागणे हे समीकरणच जणू होऊन बसले आहे. होळी किंवा शिमगा हा पवित्र आणि मंगलमय वातावरणात साजरा होत असेल ही गोष्ट आपल्याला स्वप्नातही आता खरी वाटणार नाही, पण नंदुरबारचा श्री बालाजी संस्थानचा होलिकोत्सव, होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असा सहा दिवस हा उत्सव असायचा.
या उत्सवाची सुरुवातच फार सुंदर आणि कल्पक होती. होळी पौर्णिमेच्या सायंकाळी संपूर्ण बालाजीवाडा सडा रांगोळी व पताका लावून सुशोभित करण्यात येत असे. बालाजी वाड्याच्या महाद्वारा समोर वारुळाच्या झाडाचा दांडा उभा करुन त्या भोवती लाकडे गोवऱ्यांचा ढीग करुन मोठी होळी तयार करण्यात येत असे. ही प्रथा आजतागायत चालू आहे. ही बालाजी होळी नंदुरबार मधील मुख्य मानाची होळी मानण्यात येते. संपूर्ण गावात हीच होळी प्रथम प्रज्वलीत होत असते. बुवा रोकडे पुणतांबेकर घराण्यातील कर्तापुरुष सांयंकाळी सात वाजता सोवळ्यात भगवान श्री बालाजीची महाआरती करतो नंतर होळीचे पूजन करुन त्याच आरतीने होळी प्रज्वलीत केली जाते. त्या वेळी अनेक डफ वाजविले जातात व ” अंबे मात की जय ” असा जयघोष भाविकांकडून होत असतो त्याच वेळी गावातील इतर होळ्यांचे प्रमुख येथून प्रज्वलीत अग्नि नेण्यासाठी हातात टेंभे मशाली घेऊन येतात. बालाजी होळी पेटताच त्यावरुन आपआपले टेंगे मशाली पेटवून आपल्या चौकातील होळ्या ते प्रज्वलीत करतात. अशा प्रकारे होलिकोत्सवास प्रारंभ होतो. अशी परंपरा महाराष्ट्रात आपणास इतरत्र कुठेही पाहण्यास मिळणार नाही म्हणून मी याला आगळा वेगळा होलिकोत्सव म्हणेन.
लहानपणी नाट्यगृह, सिनेमा थिएटर, रेडिओ, दूरदर्शन वगैरे करमणुकीची काहीच साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे होलिकोत्सवातील रोज रात्री होणाऱ्या लळीताला खूप गर्दी असायची. हे लळीत मुख्य अवताराच्या प्रकटीकरणाच्या आधी म्हणजे रात्री नऊ वाजता सुरु होत असे. या लळीतात भाग घेणाऱ्या व्यक्तींकडून संभाषणे पाठ करवून घेणे, नृत्याचा सराव करवून घेणे ही कामे पंधरा दिवस आधी सुरु व्हायची पूर्वी ही रंगीत तालीम करवून घेण्याचे काम कै. नाना बुवा, कै. यादव बुवा, कै डॉ. पुणतांबेकर, कै गंगाधर बुवा, कै. मुकुंद रोकडे, कै. आप्पा रोकडे, कै. भाऊ पुणतांबेकर, कै. बालाजी बुवा वगैरे मंडळी प्रामुख्याने करीत असत. होलिकोत्सवातील लळीताची रंगीत तालीम सुरु झाली आहे हे समजताच गावातील हौशी तरुण मंडळी लळीतात आम्हालाही सहभागी करुन घ्या म्हणून संचालक मंडळींकडे आग्रह धरीत असत. होलिकोत्सवातील सर्वच कामात गावकरी मंडळींचे फार सहकार्य होते. श्री बालाजी संस्थानवर सर्वांचेच अपार प्रेम होते.
होलिकोत्सवाच्या पाच दिवसातील मुख्य अवताराच्या प्रकटीकरणाआधी रात्री लळीताच्या नाट्यीकरणाला सुरुवात होत असे. त्यासाठी लागणारे स्टेज मारोती मंदिराच्या शेजारच्या ओट्यावर उभारण्यात येत असे. स्टेजवर लक्ष्मीनारायणाचा मोठा रंगीत पडदा लावलेला असायचा. उजेडासाठी गॅसबत्त्या लावलेल्या असायच्या. नाट्यमय लळीताचे सूत्रसंचालन करण्यासाठी नंदनगरीतील ख्यातनाम डॉ. वडाळकर यांचे पिताश्री कै. गोपाळबुवा वडाळकर तसेच पितामह कै. कृष्णाबुवा वडाळकर हे दोघे तळोदे येथून दरवर्षी आवर्जून येत असत. तबला – पेटीची साथ तेच करीत असत. त्या काळात दूरध्वनीक्षेपणाची व्यवस्था नव्हती तरी ही प्रेक्षकवर्ग शांततेने लळीतातील पात्रांचे संवाद, संगीत नृत्य इत्यादींचा आनंद मनमुराद घेत असे.व्यवहारात सोंग म्हणजे वेडे वाकडे पोषाख करुन तोंड विद्रुपपणे रंगवून गाढवावर बसून गळ्यात खेटराची माळ, हातात केरसुणी, असे अनेक ठिकाणी पहायला मिळते. अशा प्रकारच्या प्रदर्शन करणाऱ्याला आपण म्हणतो ” काय पण शिमग्याचे सोंग सजले आहे” पण आमच्या बालाजी संस्थानच्या होलिकोत्सवातील सोंगं वेगळीच होती. प्रत्येक सोंगाला साजेल असा भरजरी पोषाख असायचा. प्रत्येक सोंगाचे म्हणजे गणपती, सिंदूरासूर, वराह, नृसिंह, मारुती, त्राटिका, रावण, गरुड, जगदंबादेवी, महिषासूर आदि सर्व मुखवटे लाकडांचे रेखीव व आकर्षकपणे सुंदर रंगवलेले आहेत. हे सर्व मुखवटे पूर्वी दरवर्षी रंगवले जात असत. हे रंगकाम नंदनगरीतील ख्यातनाम पेंटर कै. रामदास सोमवंशी करत. त्या नंतर श्री शिरीष सोमवंशी, श्री संदीप श्रॉफ हे ते काम करु लागले. त्या त्या अवतारास लागणारे वस्त्रालंकार, आयुधे, शंख, ढाल व तलवारी वगैरे साहित्य संस्थान कडे आजही उपलब्ध आहे. प्रत्येक अवताराच्या प्रकटीकरणाच्या वेळी त्या त्या साहित्यांचा आवर्जून उपयोग केला जात होता. त्यामुळे अशा श्रृंगारलेल्या अवतार दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध होत असत.
होलिकोत्सवाच्या पाच दिवसा पैकी पहिल्या रात्री गणपती सिंदूरासूर युध्द नृत्यव्दारा होत असे. दुसऱ्या रात्री कच्छ-मस्त्य अवतार. तिसरी रात्र म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांचा दरबार भक्तप्रल्हादाचा छळ वराह व हिरण्याक्ष युध्द आणि शेवटी कागदी खांबातून नृसिंह अवताराचे प्रकटीकरण. नृसिंहाचे अवसान बघून लहान मुलांप्रमाणे मोठी माणसंही भयभीत होत असत. हिरण्यकश्यपू हातात ढाल घेऊन नृसिंहावर चाल करुन युध्दाला आव्हान देत असे. आणि नृसिंह आपल्या हातातील शंखाने आणि तोड्याने हिरण्यकश्यपूशी शेकडो डफांच्या तालावर नृत्यव्दारे युध्दकरुन त्याचा वध करीत असे. चौथी रात्र म्हणजे रामावतार त्राटिका आणि रावण वध मारुतीचा लंकादहन प्रसंग सादर करण्यात येत असे. मशाली आणि टेंभ्यांच्या उजेडात आणि शेकडो डफांच्या विशिष्ट तालात उत्सवाची प्रत्येक रात्र उजळून निघत असे. पूर्वी नंदुरबारच्या ह्या उत्सवात तसेच देवीच्या मिरवणूकीत भाडोत्री डफ वादक कधीच बोलावले गेले नव्हते. डफवादनाचा एक विशिष्ट ताल ठरलेला होता. डफ वादनासाठी प्रत्येक समाजातील मान्यवर मंडळी आपणहून येत असत. या उत्सवात डफ वादन करणे भूषणावह मानले जायचे. डफ वादनात सोनार पंच, कासार पंच, वाणी पंच, ब्राह्मण पंच यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. बालाजी वाड्यात डफ वादन करण्यासाठी प्रत्येक पंच मंडळींची जागा ठरलेली असायची त्या जागी जाऊन प्रत्येक अवतार आपले नृत्य सादर करीत असतात. प्रत्येक समाजातील मान्यवर पंच मंडळी उत्सवात डफ वादन करतात ही प्रथा महाराष्ट्रात इतरत्र कुठेही दिसणार नाही. होलिकोत्सवातील मानबिंदू म्हणजे पाचव्या रात्री निघणारी श्री जगदंबा देवीची मिरवणूक आणि देवी महिषासूर युध्द. देवी अवतार धारण करण्याचा मान फक्त बुवा – रोकडे – पुणतांबेकर घराण्यातील व्यक्तींचाच होता. पूर्वीच्या सर्वच संचालक मंडळींनी धारण केलेल्या श्री जगदंबा देवी अवताराचे दर्शन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. पूर्वी ह्या तिन्हीही घराण्यात श्री बालाजीच्या नित्य पूजेची साल वाटणी होती. ज्याचे साल असेल त्या घराण्यातील व्यक्तीने श्री जगदंबा देवीचा अवतार धारण करावा असा अलिखित नियम होता. गेल्या छप्पन्न वर्षापासून श्री गोविंद बुवा रोकडे हे एकटेच श्री बालाजीची नित्यपूजा करून संस्थानचा कारभार सांभाळीत आहेत. सध्या त्यांचे चिरंजीव प्रा. सारंग बुवा रोकडे यांनी ही धुरा सांभाळली आहे. श्री जगदंबा अवतार धारण करण्याऱ्या व्यक्तीस रंगपंचमीच्या दिवशी व्रतस्थ रहावे लागते.
डोक्यावरील सर्व केस काढून शुचिर्भूत होऊन पूजाअर्चाजपादि कर्म करुन रंगवलेला श्री जगदंबा देवीचा लाकडी मुखवटा सजवावा लागत असे. त्या मुखवट्यावर लांबसडक केसांचे गंगावण त्यावर अर्धचंद्राकार लावलेल्या दोन ठुशा, मध्यभागी बिंदी, पुढे तुरा, कानात कर्णफूलं, नाकात नथ, व कपाळी भव्य आडवा कुंकूमतिलक लावून देवीचा मुखवटा सुशोभित केला जात असे. त्या शृंगारित मुखवट्यापुढे ब्रह्मवृंदांद्वारे सप्तशती पाठ होत असे. देवी अवतार सुशोभित दिसावा. म्हणून नंदनगरीतील दानशूर व्यक्तींपैकी प्रामुख्याने कै. कन्हैयाभाई रावजीभाई, कै. अनुभाई रावजीमाई, कै. छोटूभाई सुपडूभाई, कै. कन्हैयालाल सदाशिव सराफ, कै. मदनलाल आत्माराम सराफ, कै. माधवराव रनाळकर फोटोग्राफर, या सर्वांनी शालू, शेला, पैठणी व देवीचे सर्व दागदागिने संस्थानास अर्पण केले आहेत. देवी अवतार धारण करणाऱ्या व्यक्तीस सांयंकाळी देवीची महावस्त्रे सुवासिनींकडून नेसविली जात. तसेच कासार व सोनार यांचे कडून पारंपारिक दागदागिने – पाटल्या, बांगड्या, तोडे, वाकी, पैंजण व तोरड्या इ. दागिने चढविले जातात. हे सर्व झाल्यावर आमचे घरी रात्री आठ वाजता देवीचा शृंगारित मुखवटा बांधण्यात येत असे. कंबरेला वाघाचे कडे, हातात दोन तलवारी, पायात घुंगरु धारण केल्यावर ” या देवी सर्वभूतेषु नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः ।। ” अशा ब्रह्मवृंदानी केलेल्या सप्तशतीच्या मंत्रघोषात देवी तयार होत असे. डफ, हलकाडी, संबळ यांच्या तालात व मशाली, टेंभे गॅसबत्ती यांच्या प्रकाशात देवी जगदंबा हातातील तलवारी विशिष्ट पध्दतीने फिरवीत रस्त्यावरील मिरवणूकीत सामील होत असे त्या वेळी सर्वांच्या मुखातून एकच जयघोष सुरु व्हायचा “अंबे माता की जय.” ही देवी मिरवणूक पूर्वीपासून ठराविक रस्त्यानेच जात असे. त्या रस्त्यावरील होळ्या देवी मिरवणूक येण्यापूर्वी प्रचंड प्रमाणात पेटवण्यात येत. शेकडो डफ वाजवले जात. देवीचे नृत्य पाहून सर्व भाविक आनंदित होत असत. देवी आपल्या अंगणी येणार म्हणून सुवासिनी आपल्या दाराशी सडा रांगोळी करून खणा नारळाने देवीची ओटी भरुन मनोभावे देवीची पूजा करीत असत व देवीचा आशीर्वाद घेत असत. अशी ही देवी मिरवणूक पहाटे तीन वाजता सराफ बाजारातील महिषासूर विहिरी जवळ यायची. तेथे काळीवस्त्रे परिधान केलेली व्यक्ती, डोक्यावर महिषासुराचा मुखवटा बांधून, हातात ढाल घेऊन, डफांच्या तालावर नृत्य करीत देवीला युध्दाचे आव्हान करीत असे. समोरुन येणारी संतप्त देवी, हातातील तलवारी गरगरा फिरवीत आवेशाने महिषासुरावर चाल करून जात असे. त्यालाच पहिली टक्कर असे म्हणतात. ती टक्कर पाहण्यासाठी शेकडो स्त्री पुरुष आवर्जून येत असत. तेथून देवी महिषासूर यांची मिरवणूक टक्कर देत देत रस्त्यावरच्या पूजा स्वीकारत ठराविक रस्त्याने सकाळी आठ वाजता बालाजी वाड्यात येत असे. तेथे महिषासुराचा वध होणार म्हणून प्रचंड गर्दी असायची. डफवादक बेहोष होऊन जोरात डफ वाजवायचे आणि मधल्या चौकात देवी महिषासुराचे पुन्हा भयंकर युध्द होऊन बालाजी मंदिरा समोर महिषासुराचा वध होत असे. त्या नंतर देवी जगदंबेचा बालाजी मंदिरात प्रवेश होऊन मिरवणूकीची सांगता होत असे. देवी मिरवणूक रंगपंचमीला असल्यामुळे पूर्वीचे लोक त्या दिवशी रंगपंचमी साजरी नकरता दुसऱ्या दिवशी रंग उडवून पंचमी साजरी करीत असत. दरवर्षी विजयादशमी दसरा व फाल्गुन रंगपंचमी या दिवशी सर्व अवतार मुखवटे श्री बालाजी मंदिरात दर्शनासाठी मांडण्यात येतात. त्याचे दर्शन घेतांना गावातील भाविकांच्या होलिकोत्सवासंबंधीच्या गत स्मृती जागृत झाल्या शिवाय रहात नाहीत. महाराष्ट्रात या उत्सवाची प्रसिध्दी असल्याने महाराष्ट्र शासनाने या उत्सवाचे चित्रीकरण करुन त्याचे न्युजरील करुन मोठ्या शहरातील चित्रपटगृहातून या उत्सवाला प्रसिध्दी दिली आहे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी श्री बालाजी संस्थानने संपूर्ण होलिकोत्सवातील कार्यक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डीग केले होते. त्या वरुन दोन व्हिसीडींचा संच संस्थानने तयार केला आहे. नव्यापिढीतील लोकांना आपल्या नंदुरबारला पूर्वी होलिकोत्सव कसा व्हायचा याची कल्पना येते. जुन्या पिढीतील लोकांना मात्र दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. कालाय तस्मै नमः असेच शेवटी म्हणावे लागेल पण ज्या व्यक्तीने एकदा हा होलिकोत्सव पाहिला असेल त्या व्यक्तीच्या चीरस्मरणात हा उत्सव व श्री जगदंबा देवीचे स्वरुप निश्चित राहील या बद्दल शंकाच नाही.