बेधडक मी मराठी न्यूज शहादा
शहादा:- शहादा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या.
श्री.पिंजारी यांनी सांगितले की, नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, दिनांक 10 नोव्हेंबर पासून सुरू होऊन 17 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. उमेदवारांनी विहित वेळेचे पालन करावे, कारण वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
श्री.पिंजारी यांनी स्पष्ट केले, उमेदवारांना अर्ज www.mahasecelec.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे. अर्ज सादर करतांना उमेदवारासोबत केवळ पाच व्यक्तींना (सूचक किंवा प्रतिनिधी) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाईल. सूचकांच्या संख्येबाबत सांगायचे झाल्यास, नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांसाठी एक तर अपक्ष आणि अमान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांसाठी 5 सूचकांची आवश्यकता असेल.उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्म आणि शपथपत्राची प्रत स्वाक्षरीसह सादर करावी. तसेच, नगरपरिषदेकडील येणे बाकी/थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि प्रत्येकाच्या घरात शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र आवश्यकतेने अर्जासोबत जोडावे. अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹ 2000 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹1000 असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 2001 नंतर दोनपेक्षा अधिक हयात अपत्ये नसल्याचे स्वघोषणापत्र आणि वयाची 21 वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.निवडणूक खर्चाबाबत माहिती देताना श्री.पिंजारी म्हणाले,या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता 11लक्ष 25 हजार आणि सदस्य पदाकरिता 3 लक्ष 50 हजार एवढी खर्चाची मर्यादा आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून त्याची माहिती द्यावी, तसेच दैनंदिन खर्चाचा तपशील दररोज न चुकता सादर करावा.निवडणूक वेळापत्रकाची माहिती देतांना त्यांनी सांगितले की, नामनिर्देशन पत्रांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. माघार घेण्याची अंतिम मुदत 21नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, तर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी केले जाईल. मतदान दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30ते सायं 5:30 या वेळेत तर मतमोजणी आणि निकाल 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून जाहीर होईल.
शहादा शहरात एकूण 58 हजार 972 मतदारांची नोंद करण्यात आली असून निवडणुकीसाठी 60 बूथ तयार करण्यात येणार आहेत. शहरात 730 दुबार मतदार असल्याचे तसेच दुबार मतदारांना विहित नमुन्यातील फार्म भरून एका ठिकाणी मतदान करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.