बेधडक मी मराठी न्यूज, शहादा

शहादा:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच शहादा शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भावी नगरसेवक पदाच्या इच्छुकांमध्ये उत्सुकता चरमसीमेवर असून, प्रभागनिहाय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. शहादा शहरात 14 प्रभागांतून 29 नगरसेवक निवडले जाणार असून, सुमारे 60 हजार मतदारांचे मत या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार की शिवसेना शिंदे गटासोबत युती करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सत्तेत असलेल्या भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी (आ.पवार) या घटकांनी एकत्र येऊन लढावे की स्वतंत्र मार्गाने जाण्याचा निर्णय घ्यावा, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या माजी खासदार हिनाताई गावित यांनी “नंदुरबार जिल्ह्यात भाजपा स्वबळावर लढेल” असे विधान केल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
शहाद्यातील भाजपचा सक्रिय गट काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात सामील झाल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलली आहेत. मतभेदांमुळे भाजपा सोडून गेलेले कार्यकर्ते पुन्हा भाजपाशी हातमिळवणी करतील का, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य मकरंद पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अभिजित दादा यांची भूमिका स्पष्ट झाली त्यांनी स्वतंत्र जनता विकास आघाडी तयार करून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आपल्या दालन खुले केले आहे, ते विविध कार्यकर्त्यांना एकत्र बांधत स्वतंत्र आघाडी उभी करून समोर एक आव्हान उभे केलेले आहे.
माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे यांच्या भूमीकेकडे ही नागरिकांचे लक्ष….?
एआयएमआयएम, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षही कोणत्या धोरणाने निवडणुकीत उतरतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. काँग्रेस पक्ष हे येथे नऊ तारखेला बैठक घेणार असून त्यावेळी ते आपला निर्णय जाहीर करतील. काँग्रेस पक्षाने एक स्वतंत्र पॅनल उभ करण्याचे मनसुबे माजी मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी यांनी जाहीर केले आहे . त्यामुळे तिसरे पॅनल देखील उभे राहिल असे चिन्ह आहे. असे जर झाले तर सामना हा तिरंगी लढतीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे यांनीही अद्याप आपल्या भूमिकेचा उलगडा केलेला नाही.
सोशल मीडियावर काही इच्छुक नगरसेवकांनी पक्षाचे झेंडे हातात घेत संभाव्य उमेदवारीसह प्रचार सुरू केला आहे, तर काहीजण प्रत्यक्ष भेटीद्वारे जनसंपर्क वाढवू लागले आहेत. एका प्रभागातून 3 ते 4 दावेदार असल्याने उमेदवारीवरून चुरस वाढत आहे. तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या गटातून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न काही इच्छुकांकडून सुरू असल्याचेही दिसून येत आहे.
येणारे दोन ते तीन दिवस महत्त्वाचे मानले जात असून, कोणत्या पक्षाचे किती पॅनल उभे राहणार, भाजपा व अभिजित दादा जनता विकास आघाडी पॅनल, काँग्रेसच पॅनल शिवाय उबाठा, शिंदे शिवसेना गट ए एम आय एम काय निर्णय घेतात यावर आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पारंपारिक लढत होणार की तिसरा, चौथा पर्यायही समोर येईल? याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता वाढली आहे.