बेधडक मी मराठी न्यूज, शहादा

शहादा: जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या येथील पालिका निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांचा जनता विकास आघाडीची उद्या (ता.१२) बुधवारी शहरातील स्टेट बँके जवळील महात्मा फुले चौकात सायंकाळी सात वाजता पहिलीच जाहीर सभा होणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून या सभेकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
येथील भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांचे सुपुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता राजकीय पक्षांच्या भरवशावर न राहता शहर विकासाचा अजेंडा समोर ठेऊन जनता विकास आघाडी स्थापन केली आहे. जनता विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण २९ नगरसेवक पदाचे उमेदवार व एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन संपूर्ण ३० जागा लढण्याची रणनीती आखली आहे. त्यांच्या आघाडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.शहराचे राजकारण पूर्ण बदलले असून जिल्ह्यातील नेत्यांचेही याकडे लक्ष लागले आहे. जनता विकास आघाडीचे सर्व उमेदवारांची यादी तयार असून फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेत बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील कोणता मुद्दा मांडणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून आहे.दरम्यान राजकीय सभा म्हटली म्हणजे भाषण व घोषणांनी सभा स्थळ दणाणून सोडले जाते. मात्र बुधवारी (ता.१२) सायंकाळी सात वाजता शहरातील महात्मा फुले चौकात होणारी जनता विकास आघाडीची जाहीर सभा टाळ, मृदंगाच्या गजरात होणार असल्याने ही सभा शहरवासीयांसाठी आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरणार आहे.