प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहतुकीचा बट्ट्याबोळ! अस्टोरिया ऍग्रो शुगर फॅक्टरी ‘चा भार की RTO ची बेफिकिरी? एक तासाच्या कोंडीमुळे जीव धोक्यात!

बेधडक न्यू मराठी न्यूज प्रकाश

 

नंदुरबार:- प्रकाशा ते नंदुरबार या महत्त्वपूर्ण रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास तब्बल एक तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीसाठी थेट RTO नंदुरबार आणि रस्त्यालगत असलेल्या अस्टोरिया ऍग्रो शुगर फॅक्टरीच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवले जात आहे.ज्या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते, त्याच रस्त्यावर अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे लहान वाहने आणि रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या. एका तासाहून अधिक काळ रस्ता जाम राहिल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्रासाने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.साखर कारखान्याच्या नियोजनशून्यतेमुळे कोंडी?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक कोंडीमागे अस्टोरिया ऍग्रो शुगर फॅक्टरीची अवजड वाहने आणि त्यांच्या वाहतुकीचे नियोजन कारणीभूत आहे. साखर कारखान्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर अवजड वाहनांमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो, ज्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. कारखान्याच्या वेळेनुसार वाहतुकीचे नियमन होत नसल्याने हा ‘ट्रॅफिक जाम’ नित्याचाच झाला आहे.

         नंदुरबारचे RTO दुर्लक्ष ?

या रस्त्यावरून अवजड वाहतुकीचे नियमन करण्याची प्राथमिक जबाबदारी RTO (प्रादेशिक परिवहन कार्यालय), नंदुरबार यांची आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या समस्येकडे आरटीओ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असतानाही, घटनास्थळी वाहतूक पोलीस किंवा आरटीओचे अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले.

जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण?एक तास वाहतूक कोंडीत अडकल्याने एखाद्या रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यास किंवा अपघात झाल्यास, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.जनतेच्या मूलभूत सुरक्षिततेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

या कोंडीमुळे कोणतीही जीवित हानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी आरटीओ नंदुरबारचे प्रमुख आणि अस्टोरिया ऍग्रो शुगर फॅक्टरी व्यवस्थापनावर निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *