देशात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता.शहादा)येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेला आजपासून सुरुवात

बेधडकनी मराठी न्यूज शहादा

शहादा:-  सारंगखेडा (ता.शहादा)येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेला आज पासून(ता.४) सुरुवात होत आहे. प्रशासकीय दृष्ट्या तयारी पूर्ण झाली असून देशभरातील विविध प्रांतातून घोडे व्यापारी येथे दाखल झाले आहेत. चेतक फेस्टिवल यात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. दरम्यान मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून नवस (मानता) फेडण्यासाठी आजपासूनच भाविक दाखल झाले आहेत. उद्या (ता. ४) सायंकाळी आठच्या सुमारास पालखी सोहळा व महाआरती होणार आहे.तदनंतर खऱ्या अथनि यात्रोत्सवास सुरुवात होईल.

सारंगखेडा येथील यात्रोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. उद्यापासून यात्रोत्सव भरणार असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. विविध प्रांतातून सुमारे हजारो अश्व येथे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. श्री दत्तप्रभुंच्या दर्शनासाठी तिन्ही राज्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी लागते. त्यादृष्टीने मंदिर प्रशासनाने नियोजन केले आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेटसही लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पोलिसांबरोबर स्वयंसेवकही असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने तिसरा डोळा ही कार्यान्वित केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ही पाणी, स्वच्छता आदी बाबींवर भर दिला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या आहेत.

                            अश्व क्रीडा स्पर्धा….

अश्वपंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी धावपट्टी आणि इतर तयारी पूर्ण झाली आहे. आयोजकांतर्फे चेतक फेस्टिवलची तयारी पूर्णत्वास आली आहे.फेस्टिवलमध्ये यावर्षीही अश्वसौंदर्य स्पर्धा, अश्वनृत्य स्पर्धा, घोड्यांची रेस तसेच अश्व क्रीडास्पर्धा होणार आहेत. यंदा तीन हजार पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतन फेस्टिवलचे प्रमुख जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.

             श्रीदत्त पूजन व रथोत्सव सोहळा….

नवसाला पावणारा देव म्हणून येथील एकमुखी दत्ताची सर्वत्र ख्याती आहे. महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री दत्त मंदिरात आदिगुरू श्रीदत्तप्रभू अवतार दिनानिमित्त उद्या (ता.४) विविध कार्यक्रम होणार असून सायंकाळी सहा वाजता श्रीमूर्ती पूजा अवसर, रात्री सव्वा आठ वाजता श्रीमूर्तीच्या गावातून रथोत्सव सोहळा, रात्री साडेअकरा वाजता भोजन, प्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी महानुभाव पंथाचे आचार्यगण, संत, महंतांसह , राजपत्रित अधिकारी, विविध सामाजिक, राजकीय संस्थांचे, पक्षाचे पदाधिकारी आदींसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहणार आहेत. मंदिर संस्थान तर्फे भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत तसेच तिसऱ्या डोळ्याची ही नजर राहणार असून भाविकांची दर्शन रांगेत तसेच नवस फेडताना गैरसोय होणार नाही यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

“सारंगखेडा येथील अश्व बाजारात हजारावर घोडे दाखल झाले आहेत. अजून पंधराशे ते दोन हजार घोडे येण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे येथील ऐतिहासिक अश्व बाजार व चेतक महोत्सव यंदा मोठ्या जोमाने होत आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे”….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *