बेधडक मी मराठी न्यूज शहादा

सारंगखेडा यात्रोत्सवात शहादा – दोंडाईचा मुख्य रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी
शहादा-: सारंगखेडा (ता. शहादा) येथील यात्रोत्सवात रविवारी (ता. १४) सुटीचा दिवस असल्याने लाखाहून अधिक नागरिकांनी हजेरी लावल्याने यात्रेत विक्रमी गर्दी झाली होती. परिणामी, इंटरनेट सेवा व वाहतूक सेवाही कोलमडली होती. तब्बल चार किलोमीटर हून अधिक दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे धुळे, दोंडाईचा, शहाद्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांची मात्र वाहतूक कोंडी सोडवताना मोठी कसरत झाली.
सारंगखेडा येथील यात्रोत्सवात परिसरातील जिल्ह्यातील नागरिकांसमवेत इतर राज्यांतूनही नागरिकांची हजेरी लागते. रविवार सुटीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आले होते. मागील अनुभव पाहता वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क राहणे अपेक्षित होते. परिणामी, यात्रेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. गावाच्या दोन्ही बाजूंना दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नेटवर्क ही जाम झाल्याने संपर्क करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.

शहादा दोंडाईचा मुख्य रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी
सारंगखेडा येथील श्री एकमुखी दत्तप्रभू जयंतीनिमित्त यात्रेत दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. दर वर्षी यात्रेला १५ लाखांहून अधिक भाविक येतात. या वर्षी हा आकडा २० लाखांहून अधिक जाऊ शकतो, असा अंदाज आहे.
पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्ठा….
दरम्यान यात्रे दरम्यान मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.परंतु यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंचे वाहन रस्त्यालगत असलेल्या पार्किंग मधून मुख्य मार्गावर येतांना मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याचबरोबर बेशिस्तपणे विरुद्ध दिशेने वाहन घेऊन जाणे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तापी नदीच्या पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होती.