शहाद्यात एक एप्रिल पासून पाच दिवस शिवमहापुराण कथा चारही दिशांना असणार वाहनतळ- आमदार राजेश पाडवी

शहादा : येथील मोहिदा शिवारात एक ते पाच एप्रिल दरम्यान होणाऱ्या श्री शिवपुराण महाकथेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कथा स्थळाच्या चारही दिशांना वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून पायी चालत एक किलोमीटरचा आत भाविक कथा मंडपात पोहोचतील. कथेच्या आरतीसाठी सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.पाच दिवस चालणाऱ्या या कथे दरम्यान ज्या भाविक भक्तांना रोख किंवा अन्नदान स्वरूपात देणगी द्यायची असेल त्यांनी शहारातील कृषी भवन येथील शिवपुराण महाकथेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे.

येथील मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे १०० एकर जागेत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्यप्रदेशातील सिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करणार आहेत. यावेळी या कथेच्या नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी कथा आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार राजेश पाडवी बोलत होते यावेळी प्रा. मकरंद पाटील, श्यामराव जाधव, डॉ.शशिकांत वाणी, अजय गोयल, अमर जाधव यांसह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार श्री पाडवी पुढे म्हणाले की, कथेची वेळ ही दररोज दुपारी एक ते चार अशी असून शेवटच्या दिवशी (ता.५) ला सकाळी दहा ते बारा या वेळेत कथेचे निरूपण होईल. पाच दिवस चालणाऱ्या या कथेला आठ ते दहा लाख भाविकांचा उपस्थितीच्या अंदाज आहे. जागेची साफसफाई अंतिम टप्प्यात आली असून आयोजक व सेवेकरी बांधवांच्या मदतीने लवकरच सर्व कामे उरकण्याच्या प्रयत्न आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची कमतरता भासू नये यासाठी चारही बाजूंनी मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांमार्फत अधिकाधिक सेवा देण्याच्या प्रयत्न असून भाविकांनी आयोजकांना तसेच सेवेकरी बांधवांना तसेच भगिनींना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

यावेळी कथेदरम्यान बाहेरगावाहून तसेच गावातील भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून विविध समित्या ही स्थापन करण्यात आल्या आहेत. आरोग्य पथक, अग्निशमन पथक, मदत कार्यपथक, असे अनेक पथकांमार्फत कथेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मदत करण्यात येईल. दररोज सकाळी नऊ ते साडेअकरा व सायंकाळी साडेसहा वाजता मुक्कामी असणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद वाटप होईल. त्यासाठी जवळपास ५० हजार प्लेट मागवण्यात आल्याचे ही सांगण्यात आले. भक्तांनी अधिकाधिक स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *