प्रति पंढरपूर रांझणीत भरणार उद्या विठुरायाच्या भक्तांचा मेळा !

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा तालुका प्रतिनिधी -हेमंत मराठे
मो.9689840855

*आषाढी एकादशी विशेष :

तळोदा -रांजनी तालुका तळोदा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या व नंदुरबार जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथे रविवार दि.६ रोजी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई च्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागणार आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत हजारो भाविक दिंडीने रांझणीत दाखल होणार असून भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सेवा समिती, रांझणी ग्रामस्थ तसेच ग्रा.पं.प्रशासन परिश्रम घेत आहे. दरम्यान एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर परिसराची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली आहे.
रांझणी हे गाव तळोदा शहरापासून उत्तरेला अवघ्या सात किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराने या गावाला संपूर्ण पंचक्रोशीत प्रति पंढरपूर म्हणून ख्याती प्राप्त करून दिली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. गेल्या तेविस वर्षापासून हा उत्सव सोहळा अविरतपणे सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून ,विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक उत्सुक आहेत.त्यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे.
..असे झाले मंदिर निर्माण ! सन १९९५ साली ऋषीतल्य संत मुनी नद्य योगीराज स्वामी कृष्णानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने कै.भटाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली गावात विठ्ठल मंदिर उभारण्याचा ग्रामस्थांनी संकल्प हाती घेतला.यासाठी ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करत तसेच जिल्ह्यातील अनेक दानशूर दात्यांच्या देणगीच्या सहकार्यातून अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत अर्थात दि.२४ एप्रिल १९९५ मध्ये श्री विठ्ठल रुक्माईच्या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती झाली.
आषाढी एकादशीला यात्रेचे स्वरूप!-
तेव्हापासून दरवर्षी आषाढी एकादशीला परिसरातील चिनोदा,प्रतापपूर, मोहिदा,सदगव्हाण, निंभोरा, कुकरमुंडा, रंजनपुर, रोझवा, पाडळपुर आदी गावांमधील अनेक वारकरी भक्तीभावाने ग्यानोबा तुकारामच्या गजरात पायी दिंडीने विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला येतात.दरम्यान उध्या दि.५ जुलै रोजी रांझणी अर्थात प्रति पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरत आहे. या यात्रेसाठी पूजेचे साहित्य, देवदंतांच्या मूर्तींसह, विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली जाणार आहेत. यावर्षी महापूजेचा मान निलेश दिलीप जाधव व हिमांद्री निलेश जाधव यांना देण्यात आला असून सकाळी सात ते आठ च्या दरम्यान महापूजा होणार आहे.
भाविकांसाठी निःशुल्क फराळ-
दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तळोदा येथिल स्वस्तिक हॉस्पिटल तसेच डॉक्टरांच्या टिमकडून सुमारे ६०हजाराहून अधिक राजगिरा लाडूचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच अन्य दात्यांकडूनही निशुल्क फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.रविवारची सुट्टी असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मनोरथपूर्तीची भाविकांना अनुभूती-
सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रांझणी गावातील आषाढी एकादशीच्या हा सोहळा भाविकांसाठी एक पर्वणीच असतो. जे लोक पंढरपूरला दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत ते सर्व भाविक रांझणीला प्रति पंढरपूर म्हणून आवर्जून भेट देतात. अनेक भाविक आपले नवस पूर्ण झाल्यामुळे पायी दिंडीने आल्याचे सांगतात.
माऊलीच्या जयघोषात गाव दुमदुमते
प्रतापपूर,चिनोदा, मोहिदा,तळवे, मोड आदी ठिकाणाहून पायीदिंडीने येणाऱ्या वारकऱ्यांच्या ग्यानबा तुकाराम, विठ्ठल.. विठ्ठल या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. चिनोदा येथिल स्त्री ,पुरुष वारकऱ्यांच्या दिंडीतील अश्वनृत्य व रिंगण सोहळा हा नयनरम्य आणि अद्वितीय ठरतो.
या नयनरम्य सोहळ्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल रुक्माई मंदिर सेवा समिती तसेच रांझणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीआयपी दर्शनाची सुविधा-
भाविकांच्या सेवेसाठी यावर्षी व्हीआयपी पास उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्यासाठी मंदिर सेवा समितीकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रम
पहाटे पाच वाजताची काकड आरती मंदिराचे सेवेकरी वैशाली व दिलीप जाधव यांच्या हस्ते होणार आहे.दरम्यान गावातून सकाळी आठ वाजता पालखी काढण्यात येणार असून रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मंदिर सेवा समिती ,ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन तसेच आत्माराम भजनी मंडळ, शिवानंद भजनी मंडळ, संत गुलामबाबा भजनी मंडळ, परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *