फळबाग उत्पादक शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन!

बेधडक मी मराठी न्यूज

शहादा (पुरुषोत्तमनगर) : जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व विविध कारणांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु वर्ष उलटूनही कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई अद्यापपावेतो शेतकऱ्यांना मिळालेली नाही म्हणून केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समिती नंदुरबार जिल्हा यांच्याकडून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की नंदुरबार जिल्ह्यातील हवामान आधारित फळबाग पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२४-२५ योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी केळी व पपई विमा काढला होता. वेगाचा वारा, अधिक तापमान, अवकाळी पाऊस या विविध कारणांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते; नुकसानभरपाई अद्यापपावेतो शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विमा कंपनी व सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना नुकसानभरपाई मिळालेली आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. जर शासकीय स्तरावरून २० नोव्हेंबरपर्यंत

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, तर २४ नोव्हेंबरला नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे. संबंधित निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्ताजी भरणे व पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठविण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन देताना केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *